कोरोना बाधितांच्या मृत्युची माहिती लपविल्याचा दावा चुकीचा


कोरोना बाधितांच्या मृत्युची माहिती लपविल्याचा दावा चुकीचा

आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

वाशिम, दि. २४ (जिमाका) :  जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूची माहिती आरोग्य विभागाकडून लपविण्यात येत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्रजिल्ह्यातील एकाही मृत्यूची माहिती लपविली जात नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी मृत्यूची माहिती विलंबाने प्राप्त होत आहे. मात्र, सदर माहिती प्राप्त होताच त्याची पडताळणी झाल्यानंतर ही माहिती पोर्टलवर अपलोड केली जात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

वाशिम जिल्ह्यात शासकीय व खासगी कोविड रुग्णालयात वाशिम जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील व्यक्तींवर सुद्धा उपचार केले जात आहेत. उपचारा दरम्यान खासगी रुग्णालयात व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला विलंबाने प्राप्त होते. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून संबंधित रुग्णालयांना याबाबत अवगत केले आहे.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी २१ मे रोजी सर्व खाजगी कोविड रूग्णालय चालविणाऱ्या डॉक्टरांची स्वतंत्र बैठक घेवून सदर रुग्णालयात आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची माहिती त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या अनुषंगाने सातत्याने आढावा घेण्याची जबाबदारी अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांच्यावर सोपविली आहे. त्यानुसार खासगी रुग्णालय व्यवस्थापनाकडून या मृत्यूंची माहिती आरोग्य विभागाला प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. खासगी हॉस्पिटलकडून प्राप्त होणाऱ्या माहितीची छाननी करून ती कोविड पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही सुरु आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्याबाहेरील मृत्युंचाही समावेश असल्याने सदर माहितीची छाननी करून वाशिम जिल्ह्यातील मृत्यूची अद्ययावत माहिती प्रसिद्ध केली जाईल.

जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या प्रत्येक मृत्यूची नोंद पोर्टलवर करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी २१ मे रोजीच्या आढावा बैठकीत दिले आहेत. आरोग्य विभागामार्फत सुद्धा कोरोनामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मृत्युच्या आकडेवारीत लपवाछपवी केली जात असल्याचा दावा चुकीचा असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने