वाशिम - कोरोना महामारीमुळे सर्वप्रकारच्या शारीरीक स्पर्धा बंद असतांना विविध कुस्तीस्पर्धेत भाग घेणार्या पहेलवानांचा सराव सुरु राहावा व कुस्ती साहित्यासाठी त्यांना मदत व्हावी या उद्देशातुन येथील वाशिम तालीम संघ तथा बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष सतिष उर्फ गल्ला वानखेडे यांच्या पुढाकारातून आंतरजिल्हा कुस्तीस्पर्धेसाठी आलेल्या पहेलवानांना २४ नोव्हेंबर रोजी आर्थिक मदत देण्यात आली. हा कार्यक्रम स्थानिक लाखाळा भागातील बालगोपाल तालीम मंडळाच्या आखाड्यात पार पडला.
बालगोपाल तालीममधे सराव करणार्या पहेलवानांकरीता आंतरजिल्हा कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतात कोरोनाचे सावट असल्यामुळे सर्व प्रकारचे शारीरीक खेळ आणि शारीरीक स्पर्धेवर बंदी घालण्यात आली होती. या बंदीमुळे जिल्ह्यातील सर्वच पहेलवानांना गेल्या नऊ महिन्यापासून आर्थिक टंचाई जाणवत होती. तर काही पहेलवान कुस्तीचा सराव सुद्धा सोडण्याच्या तयारीत होते. कारण बर्याच महिन्यापासून कुस्तीच्या दंगली झाल्या नाहीत. या कुस्ती स्पर्धांचा सराव करणार्या पहेलवानांना सरावासाठी येणारा खर्च आवाक्याबाहेर होता. ही परिस्थिती ओळखून बालगोपाल तालीमचे अध्यक्ष पैलवान सतिष वानखेडे यांच्या पुढाकारातुन कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन तालमीतील पहेलवानांच्या आंतरजिल्हा कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या कुस्तीस्पर्धेत भाग घेणार्या विविध पहेलवानांना सतिश वानखडे यांनी स्वखर्चातून १५ हजार, १० हजार, ५ हजार, ३ हजार, २ हजार, आणि १ हजार अशी बक्षीसे देवून त्यांचा सत्कार केला. या स्पर्धेकरीता पंच म्हणून २०११ चे भारत केसरी पै. अवधेश यादव तसेच चंद्रपूर महापौर केसरी पै. निर्मल कुमार देशवाल यांनी काम पाहीले. या स्पर्धेमुळे पहेलवान बांधवांना आर्थिक बळ मिळाले. वाशिम तालीम संघ तसेच बालगोपाल तालीम संघाच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या स्पर्धेकरीता आशिष काकडे, रोहित वानखेडे, रूपेश चौधरी, प्रल्हाद आळणे यांनी परिश्रम घेतले.