व्हिडियो बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
मॉरिशसमधील वान असलेल्या काटा येथील ऊसाला प्रचंड मागणी
काटा (वत्सगुल्म Live): वाशीम शहरापासून ५ किमी अंतरावर काटेपूर्णा आणि पुस नदीच्या पात्रात वसलेले काटा हे गाव महाराष्ट्रात काळ्या उसाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. उत्तरेला पठारावर चांदाई माता मंदिर तर गावाच्या पश्चिमेला शिवशक्ती तीर्थ आहे.
काटेपूर्णा आणि पुस नद्यांचे उगमस्थान असलेले काटा हे गाव विकसित शेती साठी आणि पुरातन संस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे.
१८ व्या शतकात मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकर सेठ हे काही खास कामानिमित्त मॉरिशस या देशाच्या दौऱ्यावर गेले होते. उष्ण वातावरण आणि कमी पाण्याच्या जमिनीत पिकणारा काळ्या रंगाच्या ऊसाचे मळे त्यांना तेथे पाहायला मिळाले. भारतातही या प्रकारच्या ऊसाचा प्रयोग करून पहावा म्हणून त्यांनी खास मॉरिशस या देशातून काळ्या ऊसाचे वान आणले होते. कालंतराने तेच वाण काटा येथील तत्कालीन शेतकऱ्यांनी मिळवुन ऊस शेती करायला सुरुवात केली म्हणूनच या उसाला मॉरिशियस ऊस असे देखिल म्हटले जाते. एरवी साखरेसाठी कारखान्यात व रसवंतीवर वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या ऊसाला हमीभाव मिळत नाही परंतु फक्त खाण्यासाठी आणि सण उत्सवामध्ये पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या काळ्या ऊसाला प्रचंड मागणी असते.
आज घडीला काटा या गावातील तब्बल १०० एकर हुन अधिक क्षेत्र उस लागवडीखाली आहे. येथील ऊस महाराष्ट्रासह गुजरात, आंध्रप्रदेश,कर्नाटक आणि मध्यप्रदेश या शेजारील राज्यातही निर्यात केला जातो. आकाराने जाड व १५ फूट उंच असलेला हा ऊस अत्यंत मऊ व चवीला अत्यंत मधूर असुन याचे अनेक आरोग्यदायी लाभ देखिल होतात अस गावकरी सांगतात. जानेवारीमध्ये ऊसाच्या बेण्याची लागवड केली जाते, वर्षभर मशागत करून ऑक्टोबरपासुन ऊसाचे पिक विक्रीसाठी उपलब्ध होते. साधारणतः एक एकर लागवड क्षेत्राला लाख रुपये खर्च येतो आणि ३ ते ४ लाखांपर्यंत नफा मिळतो.
काट्याच्या सुपीक काळ्या मातीत पिकणारा हा काळा ऊस येथील हजारो कष्टकरी शेतकऱ्यांच्या जिवनात आनंद आणि समृद्धीचा प्रकाश फुलवीत आहे.