मुलींमध्ये शिक्षणरुपी गुंतवणूक केल्यास यशाचा नफा नक्की मिळेल- रेखा वाणी
गोपाळ समाजहीत महासंघाद्वारे पुसद येथे रेखा वाणी यांचा नागरी सत्कार.
पुसद(राम धनगर) शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली त्यामुळे शिक्षण हेच आपल्या भटक्या विमुक्त समाजाच्या उन्नतीचे साधन असून समाजातील पालकांनी मुलींना शिकवुन त्यांच्यात भविष्याची शिक्षणरुपी गुंतवणूककेल्यास यशाचा नफा त्या नक्कीच मिळवून देतील असे प्रतिपदान पोलिस उपअधीक्षक पदी नियुक्त झालेल्या रेखा वाणी यांनी केले.
पुसद येथे गोपाळ समाजहीत महासंघाद्वारे आयोजित पोलीस सेवेतील अधिकारी यांच्या नागरी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. गोपाळ समाजातील पोलिस सेवेतील अधिकारी यांचा सन्मान करण्यासाठी पुसद येथे जीएसएमच्या वतीने कलावती मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या सोहळ्याचे अध्यक्ष दिनेश रुमाले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रेम हनवते, गोपाळ समाजहीत महासंघाचे राज्याध्यक्ष सुभाष गव्हाणे यांच्यासह राज्य कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी आणि समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरम्यान, पोलिस उपअधिक्षक पदी पदोन्नती झालेले जगदेव कालापाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक तान्हाजी गव्हाणे, पोलीस उपनिरीक्षक अंबादास सावंत, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हाटकर,सहाय्यक प्रकल्प अधिकारी गोदाजी सोनार, जर्मनी येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले शुभम सावंत यांचे पालक शिक्षक परशराम सावंत आदी मान्यवरांचा जाहीर नागरी सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
कोव्हिडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर प्रथमच जीएसएम महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी व यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने पुसद येथे आयोजित केलेला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राज्य कार्यकारीणी सदस्य तथा जनसंपर्क प्रमुख रमेश महाजन, यवतमाळ जिल्हाध्यक्ष संतोष मोरे यांच्यासह जीएसएम यवतमाळ जिल्हा कार्यकारीणीने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन विजय धनगर यांनी तर आभार प्रदर्शन रमेश महाजन यांनी केले.