वाशीम येथे जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सव उत्साहात संपन्न.

 वाशीम येथे जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सव उत्साहात संपन्न.

वाशीम:(टीम वत्स्गुल्म लाईव्ह) हिरवागार श्रावण मास उत्तरार्धात आहे. या महिन्यात निसर्गाच्या किमया आपल्याला अनेकविध रंग, गंध आणि चमत्कारांनी आश्चर्यचकित करतात. आषाढ महिन्यात नाजुकश्या कोंबांचे सुंदर हिरवेगार रूप श्रावणात समोर येते. श्रावणातील सण व व्रतवैकल्ये ही खासकरून ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. कारण गावांमध्ये आजही जंगल संपदा कायम आहेत. या जंगलांमध्ये, शेतात व आजूबाजूच्या भागात आषाढ, श्रावण महिन्यात अनेक रानभाज्या रुजतात. या रानभाज्या विविध जीवनसत्व व पोषक घटकांमुळे ग्रामीण जनतेसाठी सुपोषणाचे वरदानच असतात नेमकी हीच गरज ओळखून शहरी नागरिकांना रानभाज्या विषयी माहिती व्हावी व निसर्गात वाढणाऱ्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असलेल्या रानभाज्यांची चवही त्यांना चाखता यावी याकरिता तसेच शेतकऱ्यांना रानभाज्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळून त्यांना आर्थिक फायदा व्हावा याकरिता राज्यभरात कृषी मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.

    कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्माच्या वतीने वाशिम येथे १५ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले सदर कार्यक्रमांमध्ये आमदार अमित झनक जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी सभापती डॉ शाम गाभणे, वाशीमचे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा वाशिम शंकर तोटावार, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, तालुका कृषी अधिकारी अभिजीत देवगिरकर आदी मान्यवर उपस्थित होते. रानभाजी महोत्सवांमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ३७ शेतकरी उत्पादक गटांनी व ४० वैयक्तिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. रानभाजी महोत्सवांमध्ये ५६ प्रकारच्या रानभाज्या नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, त्या ठिकाणी रान भाज्या विषयी अभ्यासपूर्ण माहिती असलेले फलक लावण्यात आले होते तसेच रानभाजी माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी पालक मंत्री शंभूराज भोसले यांच्याहस्ते करण्यात आले. 

    पावसाची रिपरिप सुरू झाली की रानभाज्या रानावनात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. प्रेमाने, निगुतीने या भाज्या बनवून खाल्ल्या जातात. पाऊस सुरु झाला की, या रानभाज्या रानोमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रीय अन्न होय. कोणतंही खत किंवा कीटकनाशक नाही, कोणतीही लागवड नाही. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे.त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना रानभाज्या विषयी ओळख व माहिती व्हावी याकरीता कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी शेतकरी गटाच्या माध्यमातून रानभाज्यांचे विक्री सुद्धा करण्यात आली. रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान असल्यामुळे तसेच संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या व रानफळांची वैशिष्ठे, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पद्धती, भाजीची पाककृती (रेसिपी) याची सचित्र माहिती देण्यात आली. याद्वारे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्रीव्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होईल. ग्राहकांना आरोग्यपुर्ण भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे विचार प्रगट करण्यात आले. 

     एरवी भाजी म्हटलं, की मोजक्याच आणि ठरावीक भाज्यांची नावे आपल्याला माहीत असतात. मात्र, कधी नावही ऐकलेले नाही अशा नावांच्या भाज्या पाहण्याची, खरेदी करण्याची आणि या रानभाज्यांचा स्वाद चाखण्याची संधी या राणभाजी महोत्सवादरम्यान जिल्हावाशियांना उपलब्ध झाली. यावेळी रानातील मेवा म्हणून, अंबाडी, चिवळी, केना, शेवगा, सुरण, करवंद, आघाडा, टरोटा, पिंपळ, भूई आवळा, करटोली, राजगुरा, वाघाटे, फांदीची भाजी, कुंजीर भाजी, चमकुराचे पाने, काटसावर, जिवतीचे फुलं, माड, चावा वेल, टेरा, कर्टुलं, शेऊळ, लोथी, सतरा, हळंदा, शेवळे, कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे, नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा अशा वेगेवगळ्या प्रकारच्या तब्बल ५६  रानभाज्यांचा या महोत्सवामध्ये समावेश होता. तसेच रानभाज्यांपासून बनविलेल्या विविध पदार्थांवर ताव मारत नागरिकांनी देखील या दुर्मिळ रानमेव्याचा मनमुराद आनंद लुटला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने